वेळ अमावस्या
अमावस्या म्हणजे भूत-प्रेतांचा दिवस (रात्र), अशुभ-अमंगळ घडण्याची शक्यता अधिक हे शब्द कानी पडलेले असतातच पण आमचा मराठवाडा विशेषतः लातूर,उस्मानाबाद आणि नांदेड,बीड चा भाग अमावस्येचा सन हि आनंदाने साजरा करतो. हि अमावस्या म्हणजेच “वेळ अमावस्या”. येळ-अमोश्या, एलामास असे स्थानिक अपभ्रंश झालेला हा शब्द. अतिशय आनंदाने,उत्साहाने साजरा होणारा सन.मुळातील शब्द हा 'येळी अमावस्या' असून त्याचे नामकरण हे 'वेळ किंवा येळ अमावस्या' असे झाले. कर्नाटकात पेरणीनंतर येणारी सातवी अमावस्या म्हणजे ही येळी अमावस्या असते.
“हुलगे हुलगे-पावन पुलगे”
“ होलग्या होलग्या-सालन पलग्या”
“हर हर महादेव, हरभला भगतराजो, हरभला”
“चांगो चांगभल, पाऊस आला घरला चला “ या व अश्या ऊचाराने शिवार दुमदुमून जात.
दर्श अमावास्येला आपल्या सग्या-सोयर्यांना,मित्रांना अन अपरिचित पाहुण्यांनाही शेतकरी शेतात जेवायला घालतात.
वेळ अमावस्या साजरं करणारं एक शेतकरी कुटुंब |
शेतात समृद्धी, सुबत्ता लाभावी अशी प्रार्थना घरच्या लक्ष्मीसह शेतकरी कुटूंबिय लक्ष्मीआई पुढे करीत असतात. सर्वदात्या काळ्या आईचे आपण काहीतरी देणं लागतो या पवित्र भावनेने दर्श अमावस्या ही 'वेळ अमवस्या' म्हणून साजरी करण्याची प्रथा आहे. शुभकार्यात अमावस्या या तिथीला निषिध मानले जाते. मात्र अमावस्या ही लक्ष्मीच्या पुजेसाठी महत्वाची असते.
दिपावलीमध्ये कुबेर लक्ष्मीचे पुजन अमावस्येदिवशी होते. तिजोरीची पुजा, वहिची पुजा व्यापारी अमावस्येदिवशीच करतात तर वेळ अमावस्येदिवशी शेतामध्ये कडब्याची कोप करून शेतातल्या लक्ष्मीची पुजा केली जाते. तसेच पिकांची देखील पुजा केली जाते. आंब्याच्या झाडाखाली पाच खडे कव व चुण्याने रंगवून पांडवाची पुजा मनोभावे केली जाते.
सुगड्यामध्ये आंबिल ठेवलेले असते. पुजेनंतर सर्व शेतात चांगो चांगभल, पाऊस आला घरला चला असे म्हणत ज्वारीच्या पानाने आंबिल शिंपडली जाते. ज्वारीच्या रानात चार पाच पाच दहाटाला एकत्रित करून एखादे वस्त्र गुंडाळून फळाफळांवळसह लक्ष्मीची आईची ओटी भरून नैवेद्य दाखविला जातो.
हा सण, ही प्रथा एक वेगळीच पर्वणी असते. येथे भेदभाव अन दुरावा बाजूला सारून माणूसपणाची ऊब वाढलेली असते. ह्या दिवसात पेरलेली पिके बहरलेली असतात. वातावरणात थंडी असते, त्यामुळे अशा दिवसांत जेवण जास्त जातं अन ते शरीराला आवश्यकही असत. अशा वेळेस शेत असणारी मंडळी आपल्या मित्र-मैत्रिणी, पाहुणे, शेजारी अशांना आपल्या शेतात जेवायला येण्याचं निमंत्रण देतात. जसा सण निराळा आहे तसाच पोटोबासाठी बेतही निराळाच असतो. आंबट ताक-दहयाच आंबिल हे आदल्या रात्री बनवून एका 'बिंदग्यात' (माठ) भरून ठेवलं जात.
विलास राव देशमुख वेळ अमावस्या साजरी करताना |
आंबिल असते विशेष
आंबिल हे या सणाच खास आकर्षण असत. थंडगार आंबिलची एक वेगळीच 'नशा' असते. केवळ आंबिलावर हा बेत थांबत नाही, सोबत असतात नेहमीपेक्षा निराळे असे खास गावराण पदार्थ! या दिवशी विविध भाज्या एकत्र करून शिजवलेली भज्जी असते या भज्जीची चव जगातल्या कोणत्याच मिक्स-व्हेज भाजीला येणार नाही इतकी चवदार, ज्वारीचे उंडे असतात, ज्वारी किंवा बाजरी ची भाकरी, गुळाची पोळी, धपाटे आणि गोड भात! खरिपातील केवळ तुरीची रास होणे बाकी असते.तूरही ऐन बहरात असते व रब्बी हंगामातील पेरणी होऊन संपूर्ण शेत हिरवेगार झालेले असते. उन्हाची तीव्रता नसते. उसाचे गाळप सुरू होत असल्यामुळे ऊस खाण्याची हौस भागवता येते. गूळ, रस हाही आनंद उपभोगता येतो. असा बेत हा जिभेचे चोचले तर पुरवतोच शिवाय थंडीच्या दिवसात शरीराला ऊर्जाही मिळवून देतो.
सध्या प्रचलित होत असलेल्या हुरडा पार्ट्या खरे तर आम्ही मराठवाडेकर या वेळ अमावसेच्या माध्यमातून अनेक वर्षां पासून साजरी करत आहोत.एखादा व्यक्ति आल्यावर त्याला काहीतरी खावच लागत अशी ही परंपरा आहे. जेवण नाहीतर निदान एक ग्लास आंबिल हे अनिवार्य असतं.
वेळ अमावास्येला लातूर, उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे जिल्हाभर सुट्टी जाहीर केलेली असते; अपवाद असतो तो काही राष्ट्रीय कार्यालय आणि गावागावात जाणार्या एसटी बस महामंडळाचा. शहरातील जवळपास सर्व नागरिक कोणाच्यातरी शेतात जतातच जेणेकरून ह्या दिवशी स्थानिक शहरे अघोषित बंद असल्याप्रमाणे ओसाड पडतात.
उत्तरपुजेचे वेळी गवताच्या पेंड्या पेटवुन शेतात फिरवतात व होलगा , होलगा म्हणतात.
होलगा हा शब्द कानडी असावा, पण बहुधा सम्रुध्धी येवु दे असा काहीसा अर्थ असावा.
source:whatsapp मूळ लेखक अनामिक
0 टिप्पण्या