कोंबडीचे अंडे आणि वीट

कोंबडीचे अंडे आणि घराच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारी विट यांच्यात एका बाबतीत साम्य आहे ते कोणत्या बाबतीत आहे ? जरा ओळखुन दाखव!” मित्राने माझ्यापुढे कोडे टाकले.

मला विचारचक्रात अडकवुन स्वतः पसार झाला. मी विचार करु लागलो, “बांधकामाची विट आणि कोंबडीचे अंडे यात काय साम्य असणार?”खुप विचार करुनही उत्तर न सापडल्यामुळे शेवटी शेजारी सुरु असलेल्या बांधकामा वरुन दोन विटा आणि बाजारातुन अर्धा डझन अंडी घेउन घरी आलो. खूप निरीक्षण केले पण उत्तर सापडले नाही.

दुसर्या दिवशी तोच मित्र पुन्हा माझ्याकडे आला, “काय सापडले काय उत्तर?”

मी नकारार्थी मान हलविली आणि “आता तुच काय ते साम्य दाखवं!” असे म्हणुन ती अंडी आणि विटा त्याच्यापुढे ठेवल्या.

मित्राने हातात अंडे घेतले. ते उभे ठेवले आणि दाबले, पण ते फ़ुटले नाही . मग त्याने अंड्याला आडवे केले आणि दाबले, ते चटकन फुटले. मग त्याने दोन फ़ुटा वरुन हातात उभी धरलेली विट खाली सोडली, विटेला काहीच झाले नाही. नंतर तेवढ्याच अंतरावरुन त्याने आडवी धरुन विट खाली सोडली, आता मात्र विट फुटली.

मित्र माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला “विट आणि अंडे उभे असेपर्यंत फ़ुटत नाही, आडवे होताच फ़ुटते. हे त्या दोघांमधील साम्य. माणुस त्या विट किंवा अंड्यासारखाच -

तो जोपर्यंत खंबीरपणे उभा आहे, सजग आहे, तो पर्यंत कोणीच त्याचे भवितव्य बिघडवू शकत नाही. पण जर का तो सुस्तावला, जरा आडवा झाला, की त्याचे भवितव्य फ़ुटण्याची शक्यता बळावते." खंबिरपणे उभे राहा. जग तुमचे काही बिघडवू शकत नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या