June 8, 2023

आजची चांगली गोष्ट

रोजच्या जीवनात बरेच वेळा असं वाटतं की आपल्या मनासारखं काहीच होत नाही. होतील असं वाटणारी कामं ठप्प पडतात, अडकतात. कितीही प्रयत्न केले तरी ज्या गोष्टी व्हायच्या असतात त्या होत नाहीत….

याचं उत्तर माझ्या एका मित्राकडून मला शिकायला मिळालं. आमची मैत्री जशी वाढू लागली तसं त्यांनी मला एक मजा सांगितली. तो म्हणाला की आम्ही एकामेकांशी बोलायला लागलो की ‘आजची चांगली गोष्ट काय?’ असा प्रश्न विचारायचा. प्रश्न सोपा आहे पण पहिले काही दिवस मला नीट उत्तरंच देता येत नव्हतं. मी ‘आजची चांगली गोष्ट काहीच नाही’ असं म्हटलं की तो, ‘काहीतरी असेल, नीट विचार कर’ असं म्हणायचा.  मग मी काहीतरी छोट्यातलं छोटं छान आहे म्हणून सांगायचो. तोपण साध्या सोप्या गोष्टी ‘आजची चांगली गोष्ट’ म्हणून सांगायचा.

काही दिवस हा प्रकार सुरू राहिला आणि मला लहानातल्या लहान गोष्टी पण ‘आजची चांगली गोष्ट’ वाटू लागल्या. आज एका दुकानात मस्त कॉफी प्यायली, आज मस्त आठ तास गजर न लावता झोप झाली, आज अचानक एक जुना मित्र भेटला , अशी आमची उत्तरं येऊ लागली. मग त्याच्या प्रश्नाचा खरा अर्थ लक्षात आला. जसं आपण लहान दु:खांकडे लक्ष देतो तसं या प्रश्नामुळे आम्ही लहान सुखांकडे लक्ष देत होतो आणि कोणालातरी सांगितलं की ते सुख परत मनात यायचं. मग ‘आजची चांगली गोष्ट’च्या ऐवजी ‘आजच्या चांगल्या गोष्टी’ अशा वाढू लागल्या.

खरंच दिवसातल्या वाईट गोष्टी या चांगल्या गोष्टींसमोर शुल्लक वाटू लागल्या. आता तर मी स्वत:ला हा प्रश्न रोज झोपायच्या आधी विचारतो. गेलेला दिवस संपवताना त्यांतली एकतरी चांगली आठवण परत जगली पाहिजे. अशा छोट्या सुखांकडे नीट लक्ष दिलं तर एक एक करून सगळेच दिवस मजेत जाऊ लागतात.

तुम्ही पण हा प्रयोग करून बघा. जसं आपण बंद असलेल्या मंदिरासमोरून जातानाही ‘आत देव आहे’ या विश्वासाने नाही का नमस्कार करतो………

तसं या प्रयोगावर पण विश्वास करून बघा.
अट फक्त एकच, की तुम्ही
‘आजची चांगली गोष्ट काय?’
या प्रश्नाला काहीतरी उत्तरं दिलेच पाहिजे….
🙂

1 thought on “आजची चांगली गोष्ट काय? – सकारात्मक दृष्टिकोनासाठी करावयाची लहान गोष्ट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *