बोधकथा गरुड - स्वतःला पुढे जायचे असेल तर जरूर वाचा.

बोधकथा गरुड

एकदा एका राजाने दोन गरुडाचे पिल्लं आणले. त्यातला एक गरुड राजाने आपल्या हातावर घेतला आणि हाताला झटका देऊन त्याला आकाशात उडवले. लगेच तो आकाशात उंचच उंच झेप घ्यायला लागला, तर दुसरा मात्र आपल्या फांदीवर बसूनच होता. तो उडेचना. हे पाहून राजा फार दुःखी झाला.

त्याने आपल्या राज्यात दवंडी पिटवली, की 'जो कोणी त्याच्या दुसऱ्या गरुडाला आकाशात उडायला लावील. त्याला सुवर्ण मोहरा बक्षीस म्हणून देण्यात येतील.'

हे ऐकून बक्षिसाच्या मोहाने अनेक लोक आले, पण कोणीही गरुडाला उडवू शकले नाही. तेव्हा दवंडी ऐकून एक गरीब शेतकरी राजाकडे आला आणि मी गरुडाला उडवण्याचा प्रयत्न करतो अशी त्याने राजाला विनंती केली. अनेक रथी-महारथी थकले, तिथे हा फाटका काय करणार असा विचार राजाच्या मनात आला, पण गरुड उडणे आवश्यक होते, म्हणून त्याने त्याला संमती दिली.

शेतकरी गरुडाकडे गेला आणि परत आला. राजाने विचारले, "काय रे, उडाला काय गरुड?" तेव्हा शेतकऱ्याने आकाशाकडे बोट दाखवले. राजाने बोटाच्या दिशेने आकाशाकडे बघितले आणि काय आश्चर्य! तो दुसरा गरुड आकाशात पहिल्यापेक्षा उंच भराऱ्या घेत होता. राजा आश्चर्यचकित होऊन बघतच राहिला!

त्या धक्क्यातून सावरल्यावर त्याने शेतकऱ्याला विचारले, "अरे, तू हे कसे केलेस?"

तेव्हा शेतकरी म्हणाला, "मी काही फार वेगळं केलं नाही. मी फक्त तो गरुड बसलेला होता, ती फांदी मोडून टाकली! त्याचबरोबर त्याने उंच आकाशात भरारी घेतली!!"

आयुष्यात अनेक जण असेच कोणत्यातरी फांद्यांना चिकटून बसलेले असतात. कोणी त्यांच्या शेती-वाडीला, कोणी परंपरागत व्यवसायाला, तर कोणी छोट्या-मोठ्या नोकऱ्यांना! या छोट्या-मोठया फांद्यांना चिकटून राहून मिळेल त्यावर भागवण्याच्या नादात आपल्यातला गरुडच ते विसरून जात असतात!

मिळेल ती नोकरी धरायची. मग घर घ्यायचं. मुलं झाली की, त्यांचं शिक्षण, मग त्यांचं सेटलमेंट, लग्न, हे सारं करत-करत निवृत्त व्हायचं, बस्स, संपलं आयुष्य! यालाच मध्यमवर्गीय कुपमंडुक मानसिकता म्हणतात!

अरे कधीतरी स्वतःमध्ये डोकावून बघा! आयुष्य म्हणज फक्त इतकंच आहे काय? तुमची फांदी तोडायला कोणीही येणार नाही, हे लक्षात असू द्या. तुम्हाला जर आकाशात उंच उडायचं असेल, तर तुमची तुम्हालाच तोडावी लागेल ती फांदी! कधीतरी स्वतःच तोडून तर बघा! तुम्ही जितकं समजताय ना त्याहूनही अधिक करण्यासारखं खूप आहे हो आयुष्यात! जग खूप मोठं आहे. विशाल आहे, पण तुम्हीच स्वतःला पारंपरिक मध्यमवर्गीय मानसिकतेच्या चार भिंतींमध्ये कोंडून घेतलंय आणि त्याहूनही अधिक चिंतेची बाब म्हणजे त्या चार भिंतींनाच तुम्ही विश्व समजत आहात!

ठीक आहे, तुम्ही जगला आणि जगत असाल असं, पण कृपया तुमच्या मुलांना तरी या फांद्यांना नका बांधून ठेवू! त्यांना तरी उडू द्या स्वच्छंद अन मनसोक्तपणे आकाशात. शक्य झालंच तर तुम्ही मोडून टाका त्यांच्या फांद्या!

मग बघा तुमच्या फांदीवरचा तो पक्षी कसा दिगंतराला जातो...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या