June 8, 2023

एक व्यावसायिक कर्जात बुडाला होता आणि त्यातून बाहेर पडण्याचा कुठलाही मार्ग त्याला सुचत नव्हता. Creditors (धनको) त्याच्या घरी वारंवार चकरा मारीत होते आणि पुरवठादार बिलाच्या रकमेचा तगादा लावून होते.

असाच तो एका बगिच्यातील बेंचावर डोके हातांनी धरून बसला होता. या कर्जाच्या सापळ्यातून वाचण्यासाठी काहीतरी चमत्कार घडावा, असे त्याला खूप वाटत होते. अचानक एक वृद्ध त्याच्यासमोर उभा झाला. मला वाटते तू खूप अडचणीत आहेस, मला वाटते मी तुला मदत करू शकतो. वृद्धाने त्याला नाव विचारले आणि एक चेक लिहून त्याच्या हाती दिला. हे पैसे घे. आजपासून बरोबर एका वर्षानंतर मला याच ठिकाणी भेट आणि त्यावेळी ही रक्कम मला परत करशील, असे म्हणून तो वळला आणि वेगाने दिसेनासा झाला.

व्यावसायिकाने हातातील चेककडे पाहिले. तो 5 लाख डॉलर्सचा होता. खाली सही होती जॉन डी. रॉकफेलर, जगातील सर्वांत श्रीमंतापैकी एक. या रकमेतून माझे कर्ज चुटकीसरशी संपेल, व्यावसायिक पुटपुटला. परंतु त्याऐवजी व्यावसायिकाने तो चेक न वटविता तसाच ठेवून दिला. आता आपल्याजवळ 5 लाख डॉलर्सची रक्कम केव्हाही तयार आहे, या आत्मविश्वासाने तो कामाला लागला. नव्या उमेदीने तो कारभार बघू लागला. त्याने आधीच्या करारांना पुन्हा वाटाघाटी करून फायदेशीर

करून घेतले आणि पैसे देण्याची मुदतही वाढवून घेतली. काही मोठे करार रद्द केले. काही महिन्यातच, तो कर्जाच्या सापळ्यातून बाहेर आला आणि पुन्हा कमाई करू लागला.

बरोबर एका वर्षानंतर तो त्याच बागेत न वटविलेला चेक घेऊन आला. ठरल्याप्रमाणे तो वृद्ध तिथे पुन्हा उपस्थित झाला.

व्यावसायिक त्याला त्याचा चेक देणार आणि आपली यशाची गाथा सांगणार तेवढ्यात एक नर्स तिथे धावत धावत आली आणि तिने त्या वृद्धाला घट्ट पकडले. चला, शेवटी तुला पकडलेच, ती ओरडून व्यावसायिकाकडे बघून ती नर्स म्हणाली, ययाने तुम्हाला जास्त त्रास तर नाही ना दिला? हा नेहमी मनोरूग्णालयातून पळून जात असतो आणि लोकांना सांगतो की मी जॉन रॉकफेलर आहे म्हणून. ङ्ख असे म्हणून तिने त्या वृद्धाला ओढत नेले. व्यावसायिक थक्क होऊन हे सर्व बघत होता. त्याला काहीच कळेनासे झाले. गेले वर्षभर आपल्याजवळ 5 लाख डॉलर्स रक्कम केव्हाही तयार आहे, या थाटात तो करार करीत होता. अचानक त्याच्या लक्षात आले की, त्याचे आयुष्य बदलवून टाकणारी ही किमया खऱ्या किंवा अस्तित्वात नसलेल्या त्या रकमेची नव्हतीच. तो त्याला नव्याने गवसलेला आत्मविश्वास होता. त्यानेच त्याला कर्जाचा डोंगर उपसण्याची शक्ती दिली होती.

तात्पर्य-आत्मविश्वासाने कोणतेही कार्य केल्यास यश हे हमखास मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *