June 2, 2023

नातं…!!

माझ्या रोजच्या वर्दळीच्या डांबरी रस्त्यांला लागून असणाऱ्या एका वीटभट्टीवर एक कुटुंब खूप वर्षापासुन वास्तव्य करत आहे. अगदी रोडला लागून त्यांचे झोपडीवजा वीटा पत्र्याचे घर आहे. त्यांनी खूप दिवसापासून तपकिरी रंगाचा एक कुत्रा पाळला आहे. दिसायला चपळ आणि तितकाच टर्राट पळणारा , एक उभा तर एक पडलेला कान , सतत दोन्ही पाय पूढे ठेऊन आणि मागच्या दोन्ही पायावर पळण्यासाठी रेडी स्थितीत बसलेला असतो.

सुरूवतीला एकदा माझ्या गाडीच्या पूढे असणाऱ्या एका चालू चारचाकी गाडीच्या मागे पळायला लागला आणि गाडीचा वेग जास्त वाढला की थांबून माझ्या मागे लागला..! मी अचानक झालेल्या हल्ल्याने घाबरलो आणि कशीतरी सुटका तिथून झाली.

पुन्हा एकदा तसेच झाले आणि तीच माझी तीच गत झाली. मला खूप राग आला होता परंतु मी गाडीचा वेग तिथे आलो की कमी करायचो मग तो कधीच मागे लागला नाही. तेव्हा असं समजलं की हा गाडी हळू चालवली की मागे लागत नाही. त्यानंतर मी तिथे आलो की गाडी हळु चालवू लागलो. असेच रोज होत गेले आणि मला पण तिथून जाताना सुखरूप वाटायला लागले.

हळु हळु घाबरन्याची सवय मोडत चालली होती. परंतु एकदा त्याने पुन्हा तेच केले लपुन बसला होता तो आणि पूढे गाडी आली की अचानक उठला आणि ती चारचाकी ताणल्यानंतर नेहमी प्रमाणे माझ्या मागे पण पळाला 15-20 फूट आला असावा…

मी आता यांच्याबद्दल तेथील लोकांना कल्पना द्यावी का ? कारण एखादा अपघात होईल माझ्यासारख्या बेसावध दुचाकी कितीतरी ये-जा करत असतात या रस्त्यांवर..

दुसऱ्यादिवशी त्या झोपडीमधे राहणारा किंवा तिथं आजुबाजुला रहाणारा माणूस मला बाहेरच दिसला.

मी त्याच्याजवळ गेलो.
मी – बाबा हा कुत्रा तुमचा का ?
तो – नाही इथेच असतो आम्ही नाही पाळला.( तो जबाबदारी झट्कत मोकळा झाला)
मी – अहो मागे पळतो तो गाडीच्या ! त्याला आवरायला पाहिजे..!
माणुस – त्यो आमचा नाही. पण त्यो कुणाच्या पण मागे लागत नाही फक्त पांढरी चारचाकी दिसली की तिच्या मागे लागतो.
मी – काय ( मी तो मागे लागला तेव्हा कोणत्या गाड्या पूढे होत्या ते थोडं आठवण्याचा प्रयत्न केला )
तो – हो

लहानपणी याच्या सोबत अजून एक याचा भाऊ होता. दोघे खेळायचे , याच्या सारखाच दिसायचा. पण एकदा खेळताना चारचाकी गाडी आली आणि त्याखाली त्याचा भाऊ सापडला आणि मेला. हा तिथेच बसला होता. मग आम्ही त्याला बाजूला काढल्यावर याच्या लक्षात तशीच पांढरी गाडी राहिली आहे .आणि तेव्हा पासुन तो पांढरी गाडी आली की त्या गाडीच्या मागे पळतो.
त्याला वाटते की याच गाडीने त्याच्य़ा भावाला उडवले आहे. तो भाकरी खाल्ली की दिवसभर इथेच झोपून असतो आणि रस्त्याने येणा-जाणाऱ्या गाड्या बघत बसतो. मधुनच त्याला वाटले की हिच ती गाडी आहे तर जिव तोडून आकांत फोडून पळतौ तो…

बिचाऱ्याचे लहानपणापासून हे आणि इतकेच आयुष्य होऊन बसले आहे..

मला सगळे आठवले ज्या ज्या वेळी तो गाडीच्या मागे लागला होता त्या त्या वेळची गाडी आठवली.

प्राणी किती प्रामाणिक निरागस असतात ना ?

त्याच्या भावाच्या म्रुत्युच्या किती वेदना त्याच्या वागण्यात रुजल्या आहेत आणि इतक्या वर्षानंतर अजूनही तश्याच्या तश्या बघायला मिळतायत…!

आता मी जाता येता त्याच्याकडे खूप आपुलकीने आणि आदराने बघतो.

कारण खऱ्या नात्याप्रती त्याच्या मुक्या मनाचा सच्चेपणा त्याच्या रागातून खूप जवळून पाहायला मिळतो मला..! जो माणसात तुरळक होत चालला आहे……

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *