बोधकथा वाळवंटातील पाणी

एक सुंदर बोधकथा...

तो वाळवंटात हरवला होता. त्याच्या जवळच पाणी संपलं त्यालाही दोन दिवस झाले होते. आता पाणी नाही मिळालं तर आपलं मरण निश्चित आहे हे त्याला दिसत होतं, जाणवत होतं. हताश होऊन तो सभोवताली दूर दूर पर्यंत जेवढी नजर जाईल तिथपर्यंत डोळे ताणून ताणून पहात होता. त्याची नजर अर्थातच पाणी शोधत होती.

तेवढ्यात त्याला काही अंतरावर एक झोपडं दिसलं. तो थबकला. हा भास तर नाही? नाहीतर मृगजळ असेल. पण काही असो, तिकडे जाऊया, काही असेल तर मिळेल असा विचार करत पाय ओढत स्वतःच थकलेलं शरीर घेऊन तो निघाला. काही वेळातच त्याच्या लक्षात आले की तो भास नव्हता, झोपडी खरोखरच होती. पण ती रिकामी होती, कोणीच नव्हतं तिथे आणि ती तशी बऱ्याच दिवसांपासून, कदाचित वर्षांपासून असावी असं वाटत होतं.

पाणी मिळेल या आशेने तो आत शिरला. आणि समोरच दृष्य पाहून तो थबकलाच. माणूस मागतो एक डोळा आणि देव देतो दोन अशी त्याची स्थिती झाली.

तिथे एक हातपंप होता आणि त्याचा पाईप जमिनीत शिरला होता. त्याच्या लक्षात आलं जमिनीखाली पाणी आहे. हा पाईप तिथेच गेलाय. त्याच्या अंगात एकदम उत्साह संचारला. पुढे सरकत त्याने हातपंप जोराजोरात वरखाली करायला सुरवात केली. पण काहीच झालं नाही. पाणी आलंच नाही. नुसतात पंपाचा आवाज येत राहिला. अखेर हताश होऊन तो मटकन खाली बसला. आता आपलं मरण त्याला जास्त प्रकर्षाने जाणवले.

तेवढ्यात त्याचं लक्ष कोपऱ्यात ठेवलेल्या बाटलीकडेे गेलं. परत एक अत्यानंदाची लहर उठली. बाटली पाण्याने भरलेली होती आणि वाफ होऊन जाऊ नये म्हणून व्यवस्थित सिल केलेली होती. चटकन तो पुढे सरकला. त्याने पाणी पिण्यासाठी बाटली उघडली तेवढ्यात बाटलीवर लावलेल्या एका कागदाकडे त्याचे लक्ष गेले.

त्यावर लिहिले होते "हे पाणी पंप सुरू करण्यासाठी वापरा आणि तुमचं काम झाल्यावर ही बाटली परत भरून ठेवायला विसरू नका."

तो चक्रावलाच. त्याच्या मनात द्वंद्व सुरू झालं. काय करावं? या सुचनेकडे दुर्लक्ष करून सरळ पाणी पिऊन मोकळं व्हावं? की सुचनेप्रमाणे करावं?

समजा, सूचनेप्रमाणे पंपात पाणी ओतलं आणि पंप खराब असेल तर?, पंपाचा पाईप तुटला असेल तर?, खालचं पाणी आटून गेलं असेल तर? पाणी वायाच जाईल... सगळा खेळ खल्लास...

पण सुचना बरोबर असतील तर?... तर भरपूर पाणी... पाणी पंपात ओतण्याचा धोका पत्करावा की नाही यावर त्याच मत ठरेना.

शेवटी मनाचा निर्धार करत थरथरत्या हातांनी त्याने ते पाणी पंपात ओतले. डोळे मिटून देवाचा धावा केला आणि पंप वरखाली करायला सुरवात केली. हळूहळू पाण्याचा आवाज सुरू झाला आणि काही क्षणातच पाणी यायला सुरवात झाली. भरपूर पाणी येतं होतं. त्याला काय करू नी काय नको असं झालं. ढसाढसा पाणी प्यायला तो. स्वतः जवळच्या बाटल्या पण काठोकाठ भरल्या त्याने. तो खुप खुश झाला होता.

शांत आणि पाण्याने तृप्त झाल्यावर त्याचे लक्ष आणखी एका कागदाकडे गेले. तो त्या परिसराचा नकाशा होता. त्यावरून सहज लक्षात येत होतं की तो मानवी वस्तीपासून अजून खुप दूर होता. पण आता निदान त्याला त्याच्या पुढच्या प्रवासाची दिशा तरी समजली होती.

त्याने निघायची तयारी केली. सुचनेप्रमाणे ती बाटली भरून सिलबंद करून ठेवली. आणि त्या बाटलीवरच्या कागदावर एक ओळ स्वतः लिहीली.

"विश्वास ठेवून हे पाणी पंपात ओता, पाणी येतच" आणि तो पुढे निघाला.

तात्पर्य

ही गोष्ट आहे देण्याचं महत्व सांगणारी.

  • काही मिळवण्यासाठी काही द्यावं लागतं हे अधोरेखित करणारी. काही दिल्यानंतर मिळतं ते भरपूर असतं, आनंददायी असतं.

  • त्याही पेक्षा जास्त प्रकर्षाने ही गोष्ट विश्वासाबद्दल सांगते. विश्वासाने केलेले दान खुप आनंद देते. आपल्या कृतीमुळे फायदा होईल याची खात्री नसतानाही त्याने विश्वास दाखवला.

  • काय होईल माहिती नसताना त्याने विश्वासाने अज्ञातात उडी मारली. या गोष्टीतले पाणी म्हणजे आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या गोष्टी. त्यांच्याकरता वेळ द्या आणि त्याच्या बदल्यात कितीतरी जास्त पटीने आनंदाची झोळी भरून घ्या.

लेखक- अनामिक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या