हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेब ठाकरे

मराठी माणसाचे मानबिंदू, हिंदुहृदयसम्राट, शिवसैनिकांचे सरसेनापती, शिवसेना या महामंत्राचे जनक, मराठी माणसाचा आवाज बुलंद करणारा नेता, ज्याचा करिश्मा महाराष्ट्रातील मोठय़ा जनसमूहावर होता, उमदा स्वभाव, दोन घ्यावे, दोन द्यावे ही वृत्ती आणि त्या जोडीला कलासक्त मन हे सगळी वैशिष्टय़ ऐकून मराठी माणसाच्या डोळ्यासमोर फक्त एकच माणूस येतो तो म्हणजे बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे.

बाळासाहेबांनी महाराष्ट्रात सत्ता असताना आणि सत्तेबाहेर असतानाही राज्याच्या राजकारणावर आपला रिमोट कंट्रोल कायम ठेवला. सत्ताधीशांच्या प्रत्येक कृतीवर आणि उक्तीवर व्यंगोक्तीपूर्ण टिप्पणी करून सत्ताधीशांचीही भंबेरी उडविण्याची शक्ती ‘व्यंगचित्रकार बाळ ठाकरे’ यांच्या कुंचल्यात होती, तीच शक्ती ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’ यांच्या लेखणीत आणि प्रखर वक्तृत्वातही होती. मराठी माणसाच्या मनात आपल्या मराठीपणाचा अभिमान रुजविण्याचा वसा त्यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून गेली तब्बल ४६ वर्षे अविरतपणे चालविला आणि पार पाडला..

बालपण आणि जीवन

२३ जानेवारी, इ.स. १९२७ मध्ये प्रबोधनाची परंपरा असणाऱ्या घरात, पुणे येथे बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला. त्यांचे वडील केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे त्या काळात आपल्या लेखनातून, वक्तृत्वातून तसेच कार्याच्या माध्यमातून लोकजागरणाची धुरा सांभाळत होते. प्रबोधनकार अन्यायकारक रूढी-परंपरांवर व जातिभेदात्मक वर्णव्यवस्थेवर कडाडून हल्ला चढवत होते. तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचे योगदानही महत्त्वपूर्ण होते. प्रबोधनाचा, पुरोगामी विचारांचा व आक्रमक वृत्तीचा प्रबोधनकारांचा वारसा बाळासाहेबांमध्येही कळत-नकळतपणे उतरला.

व्यंगचित्रकार

व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे
सर्वप्रथम एक कलाकार म्हणून -एक व्यंगचित्रकार म्हणून- त्यांनी सामाजिक प्रश्र्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. इ.स. १९५० मध्ये ते 'फ्री प्रेस जर्नल’ मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्यासमवेतही काही काळ काम केले. फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करीत असतानाच बाळासाहेब विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी चित्रे-व्यंगचित्रे-जाहिरातीचे डिझाइन या क्षेत्रांतही काम करीत असत.

'मार्मिक’ व्यंगचित्र साप्ताहिक

पुढे बाळासाहेबांनी नोकरी सोडून स्वत:चे साप्ताहिक (व्यंगचित्रात्मक) काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार त्यांनी ऑगस्ट, इ.स. १९६० मध्ये ‘मार्मिक’ हे साप्ताहिक सुरू केले. साप्ताहिकासाठीचे हे ‘मार्मिक’ नाव बाळासाहेबांना प्रबोधनकारांनीच सुचविले. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणाऱ्यांना बाळासाहेबांनी प्रथम व्यंगचित्रांच्या माध्यमातून वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला.

शिवसेनेची स्थापना




महाराष्ट्रात निर्माण झालेले - मराठी द्वेषाचे व मराठी माणसांवरील अन्यायाचे - व्यंग केवळ चित्रांनी दूर होणार नाही. त्यासाठी आणखी संघटित प्रयत्न करायला हवेत असा विचार बाळासाहेबांनी केला. एक दिवशी वडिलांनी, प्रबोधनकार ठाकरेंनी प्रश्न विचारला..“बाळ लोके तर जमली पण याला संघटनेचे रूप देणार की नाही? काही नाव सुचतंय का संघटनेसाठी?” बाळासाहेब बोलले ..”विचार तर चालू आहे..पण संघटनेला नाव…” “मी सांगतो नाव…..शिवसेना. यानंतर बाळासाहेबांनी जून १९, इ.स. १९६६ रोजी ‘शिवसेनेची स्थापना केली.

समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे, पण मराठी माणूस मागेच राहिला आहे. महाराष्ट्रात सुविधा आहेत, पण मराठी माणूस दुविधेत आहे. महाराष्ट्रात उद्योग आहेत, पण मराठी तरुण बेरोजगार; तर महाराष्ट्रात पैसा आहे पण मराठी माणूस गरीब. ही परिस्थिती बाळासाहेबांनी जाणली. महाराष्ट्राला भारतात मान आहे पण मराठी माणूस महाराष्ट्रातच (प्रामुख्याने मुंबईत) अपमानित होतो आहे. हा विरोधाभास बाळासाहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिला. यातूनच मराठी माणूस संघटित झाला.

शिवसेना - भाजप युती

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब व भा.ज.प. चे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या मुत्सद्दीपणातून शिवसेना-भा.ज.प. युती आकाराला आली. तसेच पुढे प्रामुख्याने शिवसेनाप्रमुखांच्या झंझावाती सभांमुळे-दौऱ्यांमुळे इ.स. १९९५ मध्ये शिवसेना-भारतीय जनता पार्टीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले, आणि मनोहर जोशी हे शिवशाहीचे पहिले मुख्यमंत्री बनले. हे महाराष्ट्रातील खर्‍या अर्थाने पहिले काँग्रेसेतर सरकार होते. हा सत्तांतराचा चमत्कार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तृत्व व कार्यशैलीमुळेच घडला.

हिंदुत्व

हिंदुत्व आणि शिवसेना
हिंदुत्व या मुद्याबाबतही बाळासाहेबांनी आपले विचार रोखठोकपणे मांडले. बाँबस्फोट, देशविघातक कृत्ये घडवणार्‍या धर्मांधांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. मतपेटीचे राजकारण करत अशा मुस्लिमांचे लांगुलचालन कोणी करू नये. भारताला आपला देश मानणार्‍या राष्ट्रवादी मुस्लीम लोकांना आपला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही - असे स्पष्ट विचार त्यांनी शिवसैनिकांसमोर व जनतेसमोर मांडले. या स्पष्ट व रोखठोक भूमिकेमुळेच हिंदुहृदयसम्राट ही त्यांना प्राप्त झालेली उपाधी सार्थ ठरते. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ या घोषणेला खरा अर्थ महाराष्ट्रात प्राप्त झाला तो शिवसेनाप्रमुखांमुळेच. त्यांना हिंदुहृदयसम्राट तसेच सरसेनापती या नावानेही जाणले जाते.

मृत्यू


बाळासाहेब ठाकरे यांचे १७ नोव्हेंबर, इ.स. २०१२ रोजी भाप्रवेनुसार १५:३० वाजता मुंबईत मातोश्री या निवासस्थानी निधन झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या