मोटिव्हेशनल स्टोरी – विनम्रता

3
1025

“ बोधकथा विनम्रता ”

विनम्रता – एकदा एक राजा त्याच्या प्रधान, सेनापती आणि सैनिकांसह शिकारीला निघाला वाटेत अरण्यात पुढे त्यांची ताटातूट झाली. मग प्रधानाने राजाच्या शोधार्थ सैनिकाला पाठवले अरण्याच्या मध्यभागी एका साधूची झोपडी होती. साधू झोपडीच्या बाहेर झाडाखाली बसलेला असतो. पण तो साधू आंधळा असतो. सैनिक साधूच्या जवळ येतो आणि घोड्यावरूनच विचारतो, काय रे गोसावड्या आमच्या महाराजांना हिथून जाताना पाहिलेस काय? त्यावर तो साधू त्याला सांगतो, बाबा रे मी दोन्ही डोळ्यांनी आंधळा आहे, मला कस काय दिसणार. सैनिक म्हणला अरे आंधळा आहेस म्हणून काय झालं पण बहिरा तर नाहीस ना? घोड्याच्या टापाचा काही आवाज वगैरे ऐकला असशील. साधू म्हणतो नाही तस काही मी ऐकल नाही. सैनिक तिथून कोणाला तरी शिव्या देत निघून जातो.

मग थोड्या वेळाने तिथे सैनिकांचा नाईक तिथे पोहचला तो म्हणाला, काय हो साधूबुवा ईथून आमचे महाराज गेलेत काय? साधू म्हणतो, नाही रे बाबा तुमचे महाराज नाही आले इकडे, पण एक शिपाई मात्र राजेसाहेबांचा शोध करीत आला होता तो उत्तरेच्या दिशेने गेलाय.

थोड्या वेळाने तिथे सेनापती आला तो म्हणाला. साधू महाराज इथून आमचे राजेसाहेब गेले असल्याचे आपणांस काही कळले काय. साधूने त्यालाही वरील प्रमाणे उत्तर दिले. थोड्या वेळाने तिथे स्वतः प्रधान आला, आणि तो म्हणाला सूरदासजी महाराज आम्ही शिकारीला आलेल्या आमच्या राजेसाहेबांच्या शोधात आहोत. ते इकडे आल्याचे आपणाला काही कळाले का?
साधूने प्रधानालाही नकारार्थी उत्तर दिले.

आणखी थोड्या वेळाने तिथे स्वतः राजाच आला. त्याने त्या साधूबुवांना प्रणाम केला आणि विचारले, महाराज आपल्या चरणी माझे प्रणाम असावेत. मी तहानेने व्याकुळ झालोय, भगवन् आपली अनुमती असेल तर आपल्या आश्रमातील थोडेसे पाणी मी पिऊ इच्छितो.

त्यावर साधू म्हणाला राजा तुझे स्वागत असो पण तू थकून-भागून आला आहेस, त्यामुळे तू एकदम पाणी पिऊ नकोस, मी तुला काही फळ खायला देतो ती खा आणि मग पाणी पी. राजा म्हणाला, प्रज्ञाचक्षु भगवान् मी राजा आहे हे आपण कसे ओळखले? माझ्या शोधार्थ इथे कोणी आले होते काय? साधू म्हणाला होय महाराज, तुझा शोध करीत प्रथम एक शिपाई आला होता, मग शिपायांचा नाईक आला, त्यानंतर सेनापती, मग प्रधानजी आले होते.

राजा म्हणाला महाराज आपण त्यांचे अधिकार कसे काय ओळखलेत?

साधू म्हणाला त्यांच्या बोलण्याच्या शैलीवरून. जो जितका श्रेष्ठ असेल तितकी त्याची भाषा नम्र आणि मृदू असते. शिपायाने मला गोसावड्या असे म्हटले. तर नाईकाने साधूबुवा असा माझा उल्लेख केला. त्यानंतर सेनापती आला त्याने मला साधू महाराज असा आवाज दिला. प्रधानाने मला सूरदासजी महाराज असे संबोधले. आणि तू जेव्हा माझा भगवन् म्हणून माझा गौरव केलास, तेव्हाच मी ओळखले हा राजाच असला पाहिजे. कारण राजा नम्र, मृदू आणि शिलाने श्रेष्ठ असतो. या उलट हीन लोक नेहमी कठोर आणि कर्कश बोलतात.

दुसऱ्याला दुखावतात. उदार आणि परोपकारी मनाचे लोक नम्र असतात त्यांचे बोलणे आणि वागणे मृदू आणि मनोहर असते. चंद्र किरणात स्नान करावे, केशर-कस्तुरी मिश्रीत जलाचे सिंचन व्हावे, पुष्पपरागांचा वर्षाव व्हावा. अथवा मलयनिलांच्या मंद मंद लहरी याव्यात, असे उदार मनाच्या माणसाचे बोलणे आणि वागणे असते. ज्यांच्या अंतःकरणात सर्वांच्या विषयी परमेश्वराचा भाव असतो त्यांची वागणूक देखील नम्र असते.

*“नम्र झाला भूता | तेणे कोंडिले अनंता ||”*

अस संत तुकोबाराय सांगतात, आम्हीही विनम्र व्हावं आणि त्यापद्धतीने आमचं जगणं बोलणं व्हावं. जे आमच जगणं प्रतिबिंबित करेल. समृध्दीच्या काळात विनम्रता आणि संकटाच्या काळात सहनशिलता असावी. मानवाचा सर्वश्रेष्ठ गुण म्हणजे कृतज्ञता.

संकलन :- सतीश अलोनी

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here