June 8, 2023
मूर्खाची ओळख
मूर्खाची ओळख – खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक कामगार आपल्या गाढवासोबत जंगलातून चालला होता. इतक्यात रस्त्याच्या बाजूला त्याला काही चमकताना दिसलं. त्यानं जवळ जाऊन पाहिलं तर तिथे एक चमकणारा दगड पडलेला होता. त्यानं तो उचलून आपल्या गाढवाच्या गळ्यात अडकवला आणि पुढे चालू लागला.
समोरून येणाऱ्या एका हिरे व्यापाऱ्यानं गाढवाच्या गळ्यात अडकवलेला तो मौल्यवान दगड बघितला. मग त्यानं गाढवाच्या मालकाला विचारलं, ‘भाऊ मला हा दगड विकत घ्यायचा आहे. तुम्ही याचे किती पैसे घेणार?’. कामगाराला दगडाच्या किंमतीबाबत काहीच कल्पना नव्हती. फक्त शंभर रूपये घेईन, असं त्यानं सांगितलं. त्यावर हिरे-व्यापारी म्हणाला ‘शंभर रूपये तर खूप जास्त आहेत. मी फक्त पन्नास रूपयापेक्षा अधिक रक्कम नाही देणार.’ कामगारानं थोडा विचार केला आणि शंभर पेक्षा कमी रुपये घेणार नाही, असं सांगितलं. व्यापाऱ्याला वाटलं की या मौल्यवान दगडासाठी त्याला कोणी गिऱ्हाइक मिळणार नाही. मग हा कामगार ५० रुपयात हा दगड विकण्यासाठी आपल्या मागं येईल.
थोडावेळ जाऊनही कामगार त्या व्यापाऱ्याजवळ आला नाही. अखेर व्यापारीच त्याच्या शोधात निघाला. त्याला दिसलं की दुसरा एक व्यापारी त्याच्याकडून तो मौल्यवान दगड विकत घेत आहे. तो व्यापारी पळत कामगाराजवळ पोहोचला.
तोपर्यंत व्यवहार पूर्ण करून समोरचा व्यापारी निघून गेला. त्या व्यापाऱ्यानं कामगाराला विचारलं की,
‘तो दगड तू किती रुपयांना विकला?’.
कामगार म्हणाला, ‘२०० रुपये’.
व्यापाऱ्यानं त्याला म्हणाला, ‘अरे मुर्खा तो दगड अत्यंत मौल्यवान होता आणि तू अवघ्या २०० रुपयांना विकलास!’
त्यावर कामगार उत्तरला, ‘ तुम्हाला मूर्खाची ओळख करता अली नाही. मूर्ख मी नाही, तर तुम्ही ठरलात. कारण मला तर तो दगड रस्त्याच्या बाजूला पडलेला मिळाला होता आणि त्याची किंमत माहित नव्हती. पण तुम्हाला त्याची किंमत माहित असून देखील तुम्ही अवघ्या ५० रुपयांच्या हव्यासापोटी तो दगड विकत घेतला नाही. १०० रुपयात तो दगड विकत घेतला असता तर भविष्यात तुम्हाला मोठा फायदा मिळाला असता.’
तात्पर्य :- या कथेतील व्यपाऱ्याला वाटत होते कि कामगार मूर्ख आहे पण खरा मूर्ख तर तो स्वतः होता. खऱ्या आयुष्यात आपण देखील त्या व्यपाऱ्या प्रमाणेच असतो, मिळालेल्या संधीला लहान सहान हव्यासापोटी दवडत असतो.
पोस्ट उपडेट साठी आमच्या मराठी मोटिव्हेशन इंस्टग्राम पेज ला फॉलो करा.

2 thoughts on “बोधकथा – मूर्खाची ओळख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *