स्पोटकांचा जनक ते विश्वशांतीचा दूत असे अल्फ्रेड नोबेलचा रोचक प्रवास
सुमारे शंभर वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. अल्फ्रेड नोबेल ने सकाळचं वृत्तपत्र पाहिलं. आपल्या स्वतःवरचाच मृत्यूलेख पाहून त्याला धक्काच बसला. नाम साधर्म्यामुळे गफलत होऊन त्याचा मृत्यूची बातमी चुकून प्रसिद्ध झाली होती. त्याची पहिली प्रतिक्रिया म्हणजे धक्का होता. आपण खरंच मरण तर पावलो नाही ना, असंही त्याला क्षणभर वाटून गेलं.या धक्क्यातून सावरल्यावर तो पुढे वाचू लागला. मृत्यूलेखात म्हटलं होतं: विध्वंसक स्फोटकांचा जनक मरण पावला. ‘इमारती, रस्ते, पूल उद्ध्वस्त करणाऱ्या डायनामाईत या विध्वंसक स्फोटकाचा निर्माता’, ‘जगभरातील अशांततेचा फायदा घेऊन आपल्या उत्पादनाने गबर पैशाचा बनलेला धनी’ अशी विशेषणे आपल्याला लावलेली त्याने वाचली. त्याने स्वतःला प्रश्न विचारला, “हीच का माझामागे माझी ओळख उरणार आहे?” भानावर येऊन त्याने आपली चांगली ओळख मागे राहण्यासाठी काहीतरी करायचे ठरवलं.
जगाला क्षणात उध्वस्त करू शकेल अशा डायनामाइट विस्फोटकासह ३५५ शोधांचे पेटंट त्याचा नावावर असल्यामुळे तसेच, पाठोपाठ स्फोटके आणि शस्त्रास्त्रांचे अनेक कारखाने काढल्यामुळे त्याने अमाप संपत्ती जमवली. मात्र, या स्फोटकांचा उपयोग फक्त खाणी किंवा रस्ते बनवण्यासाठी न होता युद्धातही झाल्यामुळे लोकांमध्ये नोबेलची प्रतिमा ही विध्वंसकारी तंत्रज्ञान बनवणारा अशीच बनली. हीच प्रतिमा बदलण्यासाठी अल्फ्रेड नोबेल जगामध्ये शांततेसाठी काम करायला सुरुवात केली.
अल्फ्रेड नोबेल ची संपत्ती ५६ करोड अमेरिकी डॉलर च्या जवळपास होती. त्याने त्याचा मृत्युपत्रात आपली बहुतेक संपत्ती ट्रस्टच्या नावावर केली. या संपत्तीच्या हिश्शातून दरवर्षी मानवाचे कल्याण करणाऱ्या मूलभूत संशोधनाला आणि शांततेसाठी झटणाऱ्या व्यक्तीला पारितोषिक देण्याची तरतूद केली. आज विज्ञान जगतासाठी आणि समाजसेवेसाठी सर्वोच्च मानले जाणारे हेच ते नोबेल पारितोषिक.
जन्म
अल्फ्रेडचा जन्म २१ ऑगस्ट १८३३ मध्ये स्वीडनच्या स्टॉकहोम येथील बांधकाम व्यावसायिकच्या कुटुंबात झाला. त्याचे वडील मोठमोठे पूल बनवण्याचे ठेके घेत. कुटुंबात त्याचा जन्म झाला आणि दुर्दैवाचे फेरे सुरू झाले. त्याच्या वडिलांचे दिवाळे निघाले. त्यांचं जीवन खडतर, संघर्षमय झालं. त्याच्या आईने कुटुंबाला मदत व्हावी म्हणून घरातच दुकान सुरू केलं. घराचा डोलारा सांभाळत मुलाला शिक्षण देणं शक्य नसल्याने तिने मुलांना घरीच शिकवणं सुरू केलं. अल्फ्रेडवर कष्टाचे, जीवनमूल्यांचे आणि प्रामाणिकपणाचे संस्कार तिनेच बालवयात रुजवले. प्रतिभा व कार्यक्षमता तर त्याला बापाकडूनच मिळाली होती. मोठा झाल्यावर पुढे तो कामानिमित्त देशोदेशी फिरला. मात्र, आई त्याच्या हृदयात बसली होती. कामानिमित्त जगात कुठेही असला तरी आईसाठी जन्मदिनी तो कायम स्विडनमध्ये परतायचा. हा नेम त्याने आयुष्यभर पाळला.अल्फ्रेड नोबेलचा स्टोकहोम येथील घर याच ठिकाणी त्याचा जन्म झाले होते. |
डायनामाइटचा जनक
अल्फ्रेडचं जीवन म्हणजे एक चमत्कारच होता. नवव्या वर्षी शिक्षणासाठी तो रशियातील सेंट पिट्सबर्ग येथे होता. तेथून तो पॅरिसला गेला. वयाच्या १७ व्या वर्षी त्याला जगातल्या पाच भाषा बोलता येत होत्या. पुढे त्याने केमिकल इंजिनीअरिंगची पदवी मिळवली. येथेच त्याचा विस्फोटकांशी परिचय झाला. स्फोटकांविषयी अल्फ्रेडला मोठे कुतूहल वाटे. रसायनशास्त्राची आवड असल्यामुळे अल्फ्रेडने अगदी सुरुवातीपासूनच स्फोटकांचा अभ्यास सुरू केला. गन पावडर या शेकडो वर्षे वापरण्यात येणाऱ्या स्फोटकाला एखादा प्रभावी पर्याय देता येईल का, याचा अभ्यास करतानाच त्याची ओळख अस्कानिओ सोब्रेरो या शास्त्रज्ञाशी झाली. सोब्रेरोने नायट्रोग्लिसरीन हे अत्यंत संवेदनशील रसायन शोधून काढले होते.अल्फ्रेड नोबेल ने बनवलेले डायनामाईट |
अल्फ्रेडने नायट्रोग्लिसरिन व सिलिका एकत्र करून एक रसायन बनवले व त्याच नाव डायनामाइट असे ठेवले. डायनामाइटचा ग्रीकमध्ये शक्ती असा अर्थ होतो. याच डायनामाइटला नोबेलचे स्फोटक म्हणूनही ओळखले जाते. डायनामाइट हे सुरक्षित आणि नियंत्रित असे नवे स्फोटक होते. यामुळे ते सिलिंडरमध्ये भरणे सुलभ झाले. त्यावर होणारा तापमान व दाबाचा परिणाम नियंत्रणात आला. धोके टाळून ते हाताळणे सुकर झाले. या शोधामुळे विस्फोटाची शक्ती वाढली. पूर्वीच्या गनपावडरपेक्षा ती पाच पट अधिक शक्तिशाली झाली. खाणकामात व मोठ्या प्रमाणावरील बांधकाम क्षेत्रात यामुळे क्रांती आली. डायनामाइटची मागणी प्रचंड वाढली. या उत्पादनामुळे अल्फ्रेडचं जगभर नाव गेलं आणि हीच त्याची पुढे ओळख झाली.
बहुविध गुणांचा धनी
तरुण अल्फ्रेड |
अल्फ्रेड हा फक्त शोधकर्ता किंवा वैज्ञानिकच नव्हता, तर तो एक कुशल व्यापारी, उद्योजकही होता. विविध कंपन्या उघडून त्याने आपला व्यापार वाढवला. स्थिरस्थावर होऊन एखाद्या उद्योगात गुंतून न पडता त्याने आपले संशोधन सतत सुरूच ठेवले. डायनामाइटनंतर अधिक प्रभावी अशी जेलिग्नाइट आणि बॅलिस्टाइट ही स्फोटके बनवण्यातही नोबेलला यश आले. त्याच्या नावावर एकूण ३५५ पेटंट रजिस्टर आहेत.
अल्फेड हा डायनामाइटचा जनक या व्यतिरिक्त तो रसायनशास्त्रातील इंजिनीअर, शस्त्रनिर्माता, उद्योगपती, तत्त्वज्ञ, लेखक, कवी, थोर शांतिवादी म्हणूनही जगाला परिचित आहे. त्याने आयुष्यभर लेखन करून १५० पुस्तकांचं लेखन केलं आहे.
आपल्या आजूबाजूच्या समाजाचं वास्तव त्याला चिंतित करी. लोकं स्वार्थ, मोह यात वाहवत गेल्यामुळे मूल्यांचे वहन करीत नाहीत, असं त्याचं निरीक्षण होतं. यामुळे तो कुणावरही विसंबून राहत नसे व कुणावर विश्वासही ठेवत नसे. जनमानसात त्याची प्रतिमा श्रीमंतीमुळे झालेला हट्टी, एकलकोंडा अशी होती. त्याने स्वतःला कामात इतके गुंतवून घेतले होते, की आयुष्यात कौटुंबिक सुखही त्याला अनुभवता आलं नाही. त्याने लग्नच केले नव्हते.
अल्फ्रेड नोबेल विश्वशांतीचा दूत
स्वतः कोणताही स्वार्थ नसताना, कोणतेही लौकिक सुख उपभोगत नसतानाही त्याने कठोर परिश्रमाने सारी सुखं पायाशी आणली होती. मृत्यूच्या वेळी मात्र तो एकाकी, एकटाच होता. आपल्या शेवटच्या काळात तो भावूक, उदार आणि दयाळू झाला होता. यातूनच त्याच्या मनात वैराग्य निर्माण झाले. त्याला मानवतावादाने आपल्याकडे खेचून घेतले. अंतिमसमयी तो खूप भावूक झाला होता. त्याने आयुष्यभर जमलेल्या सर्व संपत्तीचा एक ट्रस्ट तयार केला. त्यात ३१ मिलियन सेक म्हणजे २६५ मिलियन डॉलर्सचा निधी जमा केला. यातून जगाची शांती वाढावी व जगाचा विकास व्हावा, विश्वाचे कल्याण व्हावे अशी त्याची कल्पना होती. आपल्या या अलौकिक कार्यामुळे अल्फ्रेड विश्वशांतीचा दूत झाला. जमा रकमेच्या व्याजातूनच आजतागायत नोबेल पुरस्कार दिले जात आहेत. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकीयशास्त्र, साहित्य, शांती आणि अर्थशास्त्र या विषयांसाठी दरवर्षी पुरस्कारांची घोषणा केली जाते. यासाठी जगात खूप मोठी स्पर्धा असते.नोबेल पुरस्काराचे स्वरूप
हाच तो प्रतिष्टीत नोबेल पुरस्कार |
source:-
विश्वशांतीचा दूत : अल्फ्रेड नोबेल- प्रा. बी. एन. चौधरी
डायनामाइट ‘शांततेचे’ स्फोटक - मयुरेश प्रभुणे
हे पण नक्की वाचा
- नील्स बोहर – विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ ( जीवन चरित्र )
- भारतातील अणुऊर्जा प्रकल्पाचे जनक – डॉ होमी भाभा
0 टिप्पण्या