डेनिस रिची - सिलिकॉन व्हॅलीमधील शापीत गंधर्व


डेनिस रिची

५ ऑक्टोबर २०११ रोजी स्टीव्ह जॉब्सचं निधन झालं आणि तंत्रज्ञानावर प्रेम करणार्‍या प्रत्येकाचं मन हळहळलं. लगोलग १२ ऑक्टोबर २०११ रोजी डेनिस रिची हा आणखी एक कम्प्यूटर जीनियस आपल्याला सोडून निघून गेला होता. पण त्याच्या निधनाच्या कॉलमवजा बातमीशिवाय कोणी फारशी दखल घेतली नाही.

स्टीव्ह जॉब्स शिवाय कुठल्याही apple च्या कुठल्याच प्रोडक्टची माहिती नसती झाली नवं तंत्रज्ञान नसतं मिळालं. पण.. डेनिस रिची शिवाय विंडोज अस्तित्वात नसती, लिनक्स अस्तित्वात नसती, सी भाषा अस्तित्वात नसती, प्रोग्रम्मिंग म्हणजे काय जगाला माहित नसतं. आपण वापरत असलेल्या संगणकाची-तंत्रज्ञानाचीच संकल्पनाच कदाचित खूप वेगळी असली असती, आत्ताचे तंत्रज्ञान-सोफ्टवेअर विश्व खूप वेगळं असलं असतं. दोघांचा हि मृत्यू एकाच वर्षी, एकाच महिन्यात, ७ दिवसांच्या अंतराने झाला. परंतु डेनिस रिची ह्यांचा मृत्यू फक्त जगातल्या मुठभर लोकांना माहित होता.

‘The Man Who Shaped Digital Era’ अशा शब्दांत ज्याचे वर्णन केले जायचे, ज्याने ‘सी’ या संगणकीय भाषेची बाराखडी या जगाला शिकवली, युनिक्स, लिनक्स आणि मल्टिक्स या संगणक प्रणालींच्या निर्मितीतील महत्त्वाचा शिलेदार असलेला डेनिस रिची मात्र सिलिकॉन व्हॅलीमधील शापीत गंधर्वच ठरला.

डेनिस रिची हा कोणी मल्टीबिलेनिअर किंवा सिलिकॉन व्हॅलीतील वंडरबॉय नव्हता. प्रसिद्धीमाध्यमांच्या ग्लॅमर पासून कायम दूर राहिलेलं पडद्यामागचं त्याचं व्यक्तिमत्त्व सामान्यांना फारसं परिचित नाही. कारण अमेरिकेतील बाजारपेठी संस्कृतीचा तो कधीच प्रतिक बनला नव्हता. एका छोट्याशा ऑफिसमध्ये अस्ताव्यस्त पडलेल्या पसार्‍यातील संगणक आणि त्यात सतत काम करत असलेला, गळाभर दाढी आणि निळ्या स्वेटरमधला डेनिस कायमच दुर्लक्षित राहिला. त्याच्या सक्सेस स्टोरी ह्या कधीच न्यूज हेडलाईन्स झाल्या नाहीत. पण त्याने निर्माण केलेल्या संगणक प्रणालींच्या जोरावरच सॉफ्टवेअरचं जग जन्माला येऊ शकलं.

डेनिसचे पूर्ण नाव डेनिस मैकलीस्टेयर रिची पण युजर नेम मात्र नेहमीच DMR वापरत असल्याने तीच त्यांची ओळख बनली. ९ सप्टेंबर १९४१ रोजी न्यूयॉर्कमध्ये डेनिस रिचीचा जन्म झाला. त्याचे वडिल अॅलिस्टर रिची हे ‘बॅल लॅब्स’ मध्ये वैज्ञानिक होते. हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधून फिजीक्स आणि अप्लाईड मॅथमॅटिक्स या दोन विषयात पदवी घेणार्‍या डेनिसने ‘Program Structure and Computational Complexity’ वर प्रबंध सादर करून पीएचडी संपादन केली. खरं तर गणितातून पदवी प्राप्त करणार्‍या डेनिसने अभ्यासाच्या कालखंडात अनेक कम्प्यूटर सेंटर्समध्ये काम केले आणि तेथेच त्याचा कल गणिताकडून संगणकाकडे वळाला.

डेनिसने निर्माण केलेल्या सॉफ्टवेअर टेक्नोलॉजीने मॉडर्न एज टेक्नोलॉजीचा डीएनए बनवला असे म्हणण्यास काहीच हरकत नसावी. आज आपण वापरत असलेल्या प्रत्येक सॉफ्टवेअर प्रोडक्टमध्ये डेनिसच्या तंत्रज्ञानाचाच आधार घेतलेला असल्याचे आपल्याला दिसून येईल. डेनिस रिची, केन थॉम्पसन जोडीने युनिक्स ऑपरेटिंग सिस्टिम जन्माला घातली. युनिक्स कमांड लाईन सिस्टिम असूनही मल्टिटास्किंग होती. त्यामुळेच अॅपलच्या मॅक-ओएस, आयफोन, आयपॅड ओएस ह्या युनिक्स प्रणालीवरच आधारीत आहेत. एवढंच काय प्रत्येकाच्या आवडीची असलेली एन्ड्रॉईड टेक्नोलॉजी ही देखील लिनक्सवरच आधारीत आहे. विंडोज वगळता जवळपास सर्वच ऑपरेटिंग सिस्टीमचा पाया युनिक्स वापरूनच रचलेला आहे.

साधारणपणे १९६९ ते १९७३ या चार वर्षांच्या कालावधीत डेनिसने बॅल लॅब्स मधील इतर सहाकारी वैज्ञानिकांच्या मदतीने ‘सी’ या प्रोग्रॅमिंग लँग्वेजची निर्मिती केली. संगणकीय जगतातील पहिलीच अत्याधुनिक अशी प्रोग्रमिंग लँग्वेज बनण्याचा मान मिळवलेली सी लँग्वेज गेल्या ४० वर्षांपासून आजवर बनवल्या गेलेल्या जवळपास हरेक ऑपरेटिंग सिस्टीमचा प्राण आहे. डेनिस आणि बॅल लॅब्स मधील त्याचा सहकारी केर्निहेन यांनी संयुक्तपणे लिहीलेलं 'द सी प्रोग्रामिंग लँग्वेज' हे पुस्तक खूपच गाजलं. डेनिस आणि त्याचे सहकारी केन थॉम्पसन आणि इतर वैज्ञानिक एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी पुढे एक पाउल पुढे जात सी++ ची निर्मिती केली. ज्याचा फायदा सन आणि ओरॅकलच्या ‘जावा’ आणि मायक्रोसॉफ्टच्या ‘सी शार्प’ या लँग्वेज तयार करण्यासाठी झाला.

१९८३ साली डेनिस रिची आणि केन थॉम्पसन यांना यूनिक्सच्या विकासातील योगदानासाठी ट्युरिंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. १९८८ साली डेनिस रिचीला त्याच्या संगणकीय क्षेत्रातील योगदान लक्षात घेउन सी आणि युनिक्सच्या भविष्यातील अनुकूलतेसाठी अपडेट करण्याच्या उद्दिष्टाने नॅशनल ऍकेडमी ऑफ इंजिनिअरींग मध्ये सिलेक्ट केलं. १९९० साली डेनिस आणि थॉम्पसन यांना IEEE कडून संयुक्तपणे हॅमिंग मेडल प्रदान करण्यात आलं. १९९७ साली कम्प्यूटर हिस्ट्री म्यूझियम कडून फेलोशिप, १९९९ साली अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या हस्ते नॅशनल मेडल ऑफ टेक्नोलॉजी प्रदान केलं गेलं. २००५ साली इंडस्ट्रीअल रिसर्च इंन्स्टिट्यूटने अचिव्हमेंट अवॉर्डने डेनिसला गौरवण्यात आले. २०११ साली पुन्हा एकदा युनिक्स मधील योगदानासाठी डेनिस आणि केन थॉम्पसन यांना एकत्रितपणे जपान प्राईज फॉर इन्फर्मेशन अँड कम्युनिकेशन प्रदान करण्यात आला.

स्टीव्हने संगणक जिवंत केला. बिल गेट्सने संगणक प्रत्येकाच्या आवाक्यात आणला. पण डेनिसने संगणकाची आणि सॉफ्टवेअरची दुनियाच बदलली. लिनक्स ही जगातील एकमात्र ओ-एस आहे जी मोफत वापरता येते. ज्यातील सॉफ्टवेअर मोफत तर असतातच शिवाय त्यात अनेक संशोधन सुचविण्याची (नवोदितांना किडे करण्याची) मुभा दिलेली असते. लिनक्सवरील लेखात मी मागेच लिनक्सचे सारे फायदे विशद केलेले होते. खरं तर बॅल लॅब्स मधील त्या वैज्ञानिकांनी संगणकीय ज्ञान विकसित करण्यासोबतच ते प्रत्येकासाठी मोफत उपलब्ध करून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला आहे.

प्रत्येक संगणकीय समस्येवर औषध शोधून देणार्‍या डॉ. डेनिस रिचीला प्रोस्टेट कँसरवर मात करता आली नाही. वयाच्या ७० व्या वर्षी न्यू जर्सी येथील त्याच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळला. संगणक जगताला अनेक बहुमूल्य देणग्या देणारा हा महान संगणक शास्त्रज्ञ त्याच्या अडचणीच्या काळात मात्र उपेक्षितच राहिला. अखेरच्या दिवसात बराच काळ तो उपचाराविनाचं राहत होता. आज डेनिस आपल्यात नाही मात्र त्याचे संशोधन, त्याची टेक्नोलॉजी सतत आपल्या सोबत आहे आणि राहील.

refrance:-

वैभव छाया, कलमनामा.. 2012

अच्यूत गोडबोले बखर संगणकाची

अश्या जबरदस्त लोकांची जबरस्त जीवन चरित्र वाचण्यासाठी आमला फेसबुकइंस्टाग्राम वर फॉलो तसेच टेलिग्राम चॅनेल ला SUBSCRIBE करायला विसरू नका.

हा लेख आवडला का तुम्हाला यांचे जीवनचित्र देखील आवडतील.
  • स्टीव्ह जॉब्स एक क्रांतीकारी वादळ | Steve Jobs Marathi Biography
  • स्टीफन हॉकिंग (stephen hawking) ज्याने मृत्यू ला नमवले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या