महात्मा गांधी
मोहनदास करमचंद गांधी उर्फ महात्मा गांधी एक असा माणूस ज्याने अहिंसेच्या मार्गाने मोठ्यातला मोठा लढा कसा लढायचा हे पूर्ण जगाला दाखवून दिले. जरी अहिंसेचे तत्त्व गांधीजींनी स्वतः मांडले नसले तरी इतक्या मोठ्या राजकीय स्तरावर अहिंसेचा अवलंब करणारे ते पहिले व्यक्ती होते. याच मुळे त्यांचा जन्मदिवस २ ऑक्टोबर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो.रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना ‘महात्मा’ (अर्थ: महान आत्मा) ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना अनधिकृपणे भारताचे राष्ट्रपिता म्हटले जाते. सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये पहिल्यांदा त्यांना ‘राष्ट्रपिता’ असे संबोधले, असे म्हणतात. अश्या महान व्यक्ती बद्दल आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.
जन्म
महात्मा गांधी चा जन्म ऑक्टोबर २, इ.स. १८६९ या दिवशी सध्याच्या गुजरातमधील पोरबंदर शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव पुतळीबाई होते. करमचंद गांधी तत्कालीन काठेवाड प्रांतातील पोरबंदरमध्ये दिवाण होते. महात्मा गांधी यांचा इ.स. १८८३ मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी कस्तुरबा माखनजी यांच्या बरोबर बालविवाह झाला. त्यांचे नाव लहान करून कस्तुरबा (आणि प्रेमाने बा) असे घेतले जाई.महात्मा गांधी लहानपणीचे |
महात्मा गांधीं नी मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. ग्लंडमध्ये कायद्याचा अभ्यास करून ते बॅरिस्टर बनले. बॅरिस्टर होऊन ते वकिली करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत गेले.
दक्षिण आफ्रिका
महात्मा गांधी इंग्लंड मध्ये |
महात्मा गांधी नी आयुष्याची २१ वर्षे दक्षिण आफ्रिकेत घालवली. या काळात त्यांना वर्णभेदाचा खूप वाईट अनुभव आला. तेथे गोरे इंग्रज हिंदी लोकांवर अतोनात जुलूम करत. त्यांना गुलामासारखं वागवलं जात असे. रेल्वे मध्ये कोणत्या वर्गात काळ्या लोकांनी बसायचे हे गोरे ठरवत. याचा अनुभव गांधीजींना देखील आला होता. हिंदी लोकांवर होणार जुलूम नाहीसा करण्यासाठी महात्मा गांधींनी अहिंसेच्या आणि सत्याग्रहाच्या मार्गांनी चळवळ केली. दक्षिण आफ्रिकेत युद्ध चालू असताना जखमी लोकांवर औषधोपचार करण्यासाठी त्यांनी सेवापथक काढले. नंतर जेंव्हा काळ्या लोकांचे बहुमत सत्तेत आले तेंव्हा गांधीना राष्ट्रीय नायक म्हणून विविध स्मारकात घोषित करण्यात आले.
चंपारण आणि खेडा
गांधीजीना पहिले मोठे यश १९१८ मध्ये चंपारण आणि खेडामधील सत्याग्रहात मिळाले. चंपारण, बिहारमधील जमीनदार, जे प्रामुख्याने ब्रिटिश होते, स्थानिक शेतकर्यांना सक्तीने नीळ उत्पादन करावयास लावत असत. त्यांना योग्य मोबदला पण मिळत नसे. यांमुळे ते सतत गरिबीत राहत.गांधीजींनी जमीनदारांविरुद्ध सुसंघटित आंदोलने चालू केली. याचा परिणाम म्हणजे तेथील जमीनदारांनी ब्रिटिश सरकारच्या मार्गदर्शनाखाली एक ठराव मंजूर केला. त्यानुसार शेतकर्यांना जास्त मोबदला आणि स्वतःच्या मतानुसार पीक घेण्याची मोकळीक मिळाली, तसेच करवाढ होऊन दुष्काळ असेपर्यंत कर भरण्यापासून सूट मिळाली. या आंदोलनादरम्यानच गांधीजींचा उल्लेख लोक ”’बापू”’ आणि ”’महात्मा”’ म्हणून करू लागले. खेडामध्ये सरदार पटेलांनी शेतकर्यांच्या बाजूने इंग्रजांसोबत वाटाघाटी केल्या. त्यानतर कर रद्द करण्यात आला आणि सर्वांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. या आंदोलनामुळे गांधीजींची प्रसिद्धी सर्व भारतभर पोहोचली.
मिठाचा सत्याग्रह
गांधीजींनी मग मार्च इ.स. १९३० मध्ये मिठावरील कराच्या विरोधात सत्याग्रहाची घोषणा केली आणि त्याची परिणती प्रसिद्ध दांडी यात्रेत झाली. १२ मार्चला अहमदाबादहून निघालेली यात्रा, ६ एप्रिलला ४०० कि.मी.चा (२५० मैल) प्रवास करून दांडीला पोहोचली. हजारोंच्या संख्येने भारतीय या यात्रेत सहभागी झाले होते. ही यात्रा इंग्रजांची भारतातील पाळेमुळे उखडण्याच्या प्रयत्नांमधील सर्वांत यशस्वी प्रयत्न ठरली. ब्रिटिशांनी उत्तरादाखल ६०,००० हून अधिक लोकांना तुरूंगात डांबले.महात्मा गांधी दांडी यात्रेत |
शेवटी लॉर्ड एडवर्ड आयर्विन यांच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश सरकारने गांधीजींशी वाटाघाटी करण्याचे ठरवले. मार्च इ.स. १९३१ मध्ये गांधी-आयर्विन करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या करारानुसार ब्रिटिश सरकारने सर्व भारतीय कैद्यांना मुक्त करण्याचे मान्य केले आणि त्याबदल्यात कायदेभंगाची चळवळ बंद करण्याची मागणी घातली. याबरोबरच गांधीजींना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा एकमेव प्रतिनिधी म्हणून लंडनमध्ये होणार्या गोल मेज परिषदेचे आमंत्रण दिले. ही परिषद गांधीजी आणि पक्षासाठी निराशाजनकच ठरली, कारण त्यामध्ये सत्तांतरणावर भर देण्याऎवजी भारतातील राजे-रजवाडे आणि अल्पसंख्यक यांच्यावर जास्त भर देण्यात आला होता.
भारत छोडो आंदोलन
इ.स. १९३९ मध्ये जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले आणि दुसर्या महायुद्धाला सुरुवात झाली. दीर्घ विचारविनिमयानंतर गांधीजींनी जाहीर केले की, भारत या युद्धाचा एक भाग बनणार नाही, कारण हे युद्ध वरवर तर लोकशाहीवादी स्वातंत्र्यासाठी म्हणून लढवले जात होते आणि दुसरीकडे तेच स्वातंत्र्य भारताला नाकारण्यात येत होते. जसेजसे युद्ध पुढे सरकत गेले तसेतसे गांधीजी स्वातंत्र्याची मागणी तीव्र करत गेले. त्यांनी एक ठराव मांडला ज्याद्वारे इंग्रजांना 'भारत सोडून जा' (भारत छोडो) असे ठणकावण्यात आले. हा गांधीजी आणि पक्षाचा ब्रिटिशांना भारतातून हाकलून देण्याचा सर्वांत स्पष्ट व अंतिम प्रयत्न होता.भारत छोडो चळवळ भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील सर्वांत प्रभावी चळवळ ठरली. यात लाखांच्या संख्येने लोकांना अटका झाल्या, अभूतपूर्व अत्याचार करण्यात आला. हजारो आंदोलक पोलिसांच्या गोळीबारात मरण पावले.गांधीजी आणि त्यांच्या सहकार्यांनी हे स्पष्ट केले की भारताला तात्काळ स्वातंत्र्य दिल्याशिवाय भारत महायुद्धात मदत करणार नाही. गांधीजींनी हेसुद्धा स्पष्ट केले की यावेळेस एखाद-दुसर्या हिंसक घटनेमुळे ही चळवळ मागे घेण्यात येणार नाही. आवरात ठेवलेल्या अराजकतेपेक्षा खरी अराजकता बरी. असे सुचवून त्यांनी काँग्रेस सदस्यांना अहिंसेचे पालन करण्याचे आवाहन केले आणि भारतीयांना 'करो या मरो' (करा किंवा मरा) हा मूलमंत्र दिला.
स्वातंत्र्य आणि भारताची फाळणी
१९४७ ला भारत स्वतंत्र झाला. तेंव्ह हिंदू-मुस्लिमांमधील अंतर्गत युद्ध टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणून काँग्रेसने फाळणीच्या आराखड्याला मान्यता दिली. फाळणी नंतर सीमेवरील परिस्थिती खूपच बिघडली. सीमेलगत हिंदू मुस्लिम दंगली भडकल्या भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या उंबठ्यावर होते. युद्धाच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारचा फाळणी करारानुसार ठरलेले ५५ कोटी रूपये पाकिस्तानला न देण्याचा निर्णय भारताने घेतला. सरदार पटेलांसारख्या नेत्यांना वाटत होते की, या पैशांचा उपयोग पाकिस्तान युद्धासाठी भांडवल पुरवण्यासाठीच करेल.सर्व मुस्लिमांना पाकिस्तानात पाठवून द्यावे या मागणीने परत जोर पकडला होता. तसेच हिंदू आणि मुस्लिम नेते एकमेकांना समजून घेण्यात असमर्थता दाखवीत होते. या सर्व कारणांनी गांधीजी अत्यंत व्यथित झाले होते. त्यांनी या दंगली बंद करण्याच्या आणि पाकिस्तानला ५५ कोटी देण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण चालू केले. गांधीजींना भीती वाटत होती की, पाकिस्तानमधील अस्थिरतेमुळे आणि असुरक्षिततेमुळे तेथील लोकांचा भारताबद्दलचा राग वाढेल आणि या दंगली देशाच्या सीमा ओलांडून जातील, तसेच हिंदू आणि मुस्लिमांमधील शत्रुत्व परत डोके वर काढील आणि त्याची परिणिती अंतर्गत बंडात होईल. त्यांच्या आयुष्यभराच्या सहकार्यांसोबतच्या अनेक वादविवादांनंतरही गांधीजी आपल्या निर्णयावरून मागे हटले नाहीत आणि शेवटी सरकारने आपला निर्णय मागे घेतला आणि पाकिस्तानला ५५ कोटी रूपये दिले.
1 टिप्पण्या
Mahatma Gandhinchi khup chan mahiti ahe.
उत्तर द्याहटवा