महात्मा जोतिबा फुले – आद्य सामाजिक क्रांतिकारक

1
1600
views

महात्मा जोतिबा फुले – सामाजिक क्रांतिकारक

महात्मा जोतिबा फुले हे ऐन इंग्रजी अमदानीत पाश्चात्त्य शिक्षण घेऊन जे समाजसुधारक पुढे आले त्यांपैकी एक होते. आपल्या समाजातील दलित, शूद्रतिशूद्र मानलेल्या बांधवांच्या उद्धारासाठी आयुष्यभर निरपेक्ष कार्य करणारे महात्मा जोतिबा फुले यांना आद्य सामाजिक क्रांतिकारक असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही.

त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी केली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देऊन मुहुर्तमेढ रोवली. त्यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा १८४८ साली पुणे येथे भिडेंच्या वाड्यात उघडली. आपल्या पुरोगामी विचारांची निर्भयपणे मांडणी केली व स्वत:चे विचार आचरणात आणले.

बालपण आणि शिक्षण

१८२७ साली जोतिबांचा जन्म झाला. त्यांचे मूळचे गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण, आडनाव गोऱ्हे. परंतु गरिबीमुळे जोतीरावांच्या वडिलांनी पुण्यात येऊन फुलांचा व्यवसाय सुरू केला; म्हणून त्यांचे आडनाव फुले असे झाले. जोतीराव लहानपणापासून अत्यंत हुशार होते. घरच्या गरिबीशी झगडत अत्यंत कष्टाने त्यांनी शिक्षण घेतले. मराठी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते मिशनऱ्यांच्या इंग्रजी शाळेत गेले. मिशनऱ्यांच्या संपर्कामुळे त्यांना इंगजी उत्तम येऊ लागली.

ख्रिस्ती धर्मोपदेशकांची सेवावृत्ती, त्यांचे शिक्षणकार्य व कर्तव्यनिष्ठा पाहून जोतीबा भारावून गेले. त्या काळी स्त्रिया व दलित अस्पृश्य समाज यांची स्थिती फारच वाईट होती. त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. त्यांना समजात खूपच हीन वागणूक होती, त्यात जर स्त्री विधवा झाली तर तिचे जगणे नर्कच बनून जात असे.

हि दयनीय स्तिती जोतीबाना पाहवत नव्हते. समाजातील स्त्रियांना व मागासलेल्या बहुजनांना त्यांनी शिक्षण देण्याचे ठरवले. शिक्षणानेच त्यांची परिस्थिती सुधारेल असे त्यांना ठामपणे वाटत असे.

सामाजिक कार्य

मुलींना शिक्षण देण्यासाठी जोतिबांनी पुण्यात १८४८ साली मुलींच्यासाठी शाळा काढली. जोतिबांनी आपल्या पत्नीला- सावित्रीबाईंना शिक्षण देऊन त्यांना शिक्षिका केले. सावित्रीबाई मुलींच्या शाळेत शिकवू लागल्या. मुली शिकू लागल्या हे त्या वेळच्या पुण्यातील कर्मठ लोकांना मुळीच आवडले नाही. मुलींना शिक्षण देणे हे पाप आहे; हे धर्म संकट आहे; असे समजून त्यांनी जोतिबा व सावित्रीबाई यांचा अतोनात छळ केला. परंतु ते डगमगले नाहीत. जोतिबांनी अस्पृश्य मुलांसाठी. १८५७ साली आणखी एक शाळा काढली. तेथे मोफत शिक्षण सुरू केले. जोतीबा अस्पृश्यतेच्या विरोधी होते. त्यांनी आपल्या घरच्या हौदावर पाणी भरण्यास अस्पृश्यांना परवानगी दिली.

सत्यशोधक समाज

त्या काळी शेतकरी व मजूर यांची स्थिती फार वाईट होती. सावकार शेतकर्‍यांना नाना प्रकारे छळत. शेतकरी अशिक्षित असल्याने त्यांच्या शेतीमालाला चांगली किंमत मिळत नसे; फसवणूक होई. यासाठी जोतिबांनी
शेतकऱ्यांच्या, मजुरांच्या मुलांना शिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यांच्यासाठी वसतिगृहे काढली. १९७३ साली जोतिबांनी ‘सत्यशोधक समाज’ ही संस्था स्थापन केली. “ईश्वर एक आहे. ईश्वराने निर्माण केलेली माणसे एक आहेत”, ही या समाजाची तत्वे होती. ‘सार्वजनिक सत्यधर्म’ या ग्रंथात फुल्यांनी सत्य धर्माचे विवेचन केले आहे.

मृत्यू

जोतिबांनी स्त्रीशिक्षणासाठी व अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी व त्यांना माणुसकीचे हक्क मिळावेत यासाठी जे अपूर्व कार्य केले त्यामुळे जनतेनेच त्यांच्या हयातीतच त्यांचा गौरव करून त्यांना ‘महात्मा’ ही पदवी दिली. २७ नोव्हेंबर, १८९० रोजी या थोर समाजसुधारकाचे निधन झाले.

source:- विकिपीडिया

1 COMMENT

Leave a Reply