लोकशाहीर, सामाजिक कार्यकर्ते आणि सुप्रसिद्ध लेखक अण्णाभाऊ साठे - जीवन चरित्र

अण्णाभाऊ साठे

तुकाराम भाऊराव ऊर्फ शाहीर अण्णाभाऊ साठे हे एक मराठी समाजसुधारक,  दीन-दुबळ्यांचे, उपेक्षितांच्या जीवनाचे वास्तव चित्रण करणारे साहित्यिक, लेखक होते. ते कधीच शाळेत गेले नाहीत. परंतु तरीही आपल्या लेखणीच्या जोरावर समाजमन ढवळून काढण्याची ताकद त्यांच्यात होती.

जन्म

१ ऑगस्ट १९२० रोजी मातंग समाजातील भाऊ शिदोजी साठे आणि वालुबाई यांच्या पोटी आण्णांचा जन्म झाला. साठे ह्यांचा जन्म हा इतिहासातील एक दुर्मिळ योगायोग म्हणू शकतो. ज्या दिवशी आण्णाभाउ जन्माला आले होते त्याच दिवशी म्हणजे १ ऑगस्ट १९२० रोजी लोकमान्य टिळकांचे निधन झाले होते. एक तारा अस्ताला जात असतानाच दुसरा तारा त्याच दिवशी जन्म घेत होता.

वयक्तिक जीवन

साठे हे शाळेत शिकलेले नाही, केवळ दीड दिवस ते शाळेत गेले नंतर तेथील सर्वणांद्वारे होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिली. त्यांनी दोन लग्न केलीत, त्यांची पहिली पत्नी कोंडाबाई साठे तर दुसरी जयवंता साठे ह्या होत. त्यांना एकूण तीन अपत्ये होती - मधुकर, शांता आणि शकुंतला.

शाहीर अण्णा भाऊ साठे म्हणजे जातिभेदांमुळे, जातींच्या उतरंडीमुळे शिक्षणापासून, समग्र विकासापासून वंचित राहिलेल्या मातंग समाजातील एक समृद्ध व्यक्तिमत्त्व.खालच्या जातीतील म्हणून गावात कुणाला शिवायचे नाही, हातात हात मिळवायचा नाही, हे अण्णांनी लहानपणीच पाहिले. अनुभवले. अगदी वर्गातही त्या काळी प्रत्येक जातीची मुले वेगवेगळी बसत.

'आम्हीही ही माणसं आहोत, आम्हालाही सुखाने, स्वाभिमानाने व स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार आहे' या न्याय्य मागणीने अण्णा पेटून उठले.

१९४४ ला त्यांनी `लाल बावटा` पथक स्थापन केले आणि बघता बघता ते शाहीर झाले. `माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीया काह्यली।।`ही त्यांची गाजलेली लावणी होती.

अण्णाभाउंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशिया पर्यंत पोवाड्यातून सांगितले पुढे त्याचे रशियन भाषेमध्ये भाषांतर झाले आणि राष्ट्रध्यशक्षांकडून त्यांचा सन्मान देखील झाला. १६ ऑगष्ट १९४७ साली “ये आझादी जुठी हे देश कि जनता भुकी हे” असा नारा शिवाजी पार्क वर दिला त्या दिवशी पावसाने रौद्र रूप धारण केले होते. मात्र, तरीही अण्णाभाऊ मागे हटले नाहीत.

साहित्य संपदा

लोकनाट्य : 13 I नाटके : 3 I कथासंग्रह : 13 I कादंबर्‍या : 35 I पोवाडे : 15 I प्रवास वर्णन : 1 I चित्रपट कथा : 7

'फकिरा' ला प्रचंड यश : त्यांच्या फकिरा (1959) या कादंबरीला प्रचंड यश मिळाले. या कादंबरीस राज्य सरकारने 1961 सालात उत्कृष्ट कादंबरी पुरुस्कार देऊन गौरविले. ‘फकिरा’च्या आजपर्यंत सोळा आवृत्त्या निघाल्या.

अण्णा भाऊंच्या साहित्याचे हिंदी, गुजराती, उडीया, बंगाली, तमीळ, मल्याळी या भारतीय भाषांबरोबरच रशियन, झेक, पोलिश, इंग्रजी, फ्रेंच अशा जगातील २७ भाषांमधे भाषांतर झाले आहे यातच अण्णाभाऊंचे सामर्थ्य आहे.

त्यांच्या वाङ्मयीन कर्तृत्वाने साहित्य सम्राटांना चक्रावून सोडले. हिंमत धरणारा माणूस मराठी साहित्यात त्यांनी उभा केला. मराठी मातीला वैभव दिले, मराठी भाषेचे सोने केले. पु.लं.नी तर त्यांचे ‘तीन पैशाचा तमाशा’ हे नाटक अण्णाभाऊंना समर्पित करून लिहिले.

अण्णाभाऊंना अवघे ४९ वर्षाचे आयुष्य लाभले.कलापथकाच्या माध्यमातून समाजात जागृती करण्याचे काम त्यांनी शेवटपर्यंत केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत डफावर थाप देत त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. आयुष्यात प्रसिद्धी मिळाली तरी त्यांना लक्ष्मी कधीच प्रसन्न झाली नाही. लौकिक अर्थाने कोणतेही शिक्षण न घेता साहित्य क्षेत्रात जगप्रसिद्ध झालेला हा कलाकार काही दुर्दैवी संघर्षांमुळे खचत गेला. त्यामुळेच १८ जुलै, १९६९ रोजी अवघ्या ४९व्या वर्षी अण्णा भाऊंचे निधन झाले.

आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे काही प्रेरणादायी विचार पाहुयात... 

1) हे मानवा तू गुलाम नाहीस, तू या वास्तव जगाचा निर्माता आहेस.
2) जग बदल घालूनी घाव, आम्हा सांगून गेले भीमराव.
3) नैराश्य हे तलवारीवर साचलेल्या धुळीसारखे असते. धुळ झटकली की ती तलवार पुन्हा धारदार बनते.
4) जात हे वास्तव आहे, गरिबी ही कृत्रिम आहे. गरिबी नष्ट करता येऊ शकते. जात नष्ट करणे आपले सर्वांचे काम आहे.
5) अनिष्ठ धर्माच्या आचरणाने माणसांना हीन समजणे हा धर्म नसून तो एक रोग आहे.

विशेष बाबी :

  • तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचे श्रेय त्यांना दिले जाते.
  • ते दलित समाजाचे विशेषत: मांग जातीचे प्रतीक बनले.
  • 1 ऑगस्ट 2001 रोजी भारतीय पोस्टाने विशेष ₹4 टपाल तिकिटावर साठेंचे चित्र ठेवले होते. 
  • पुण्यातील लोकशाहीर अण्णाभा साठे स्मारक आणि कुर्ला मधील एक उड्डाणपूल यासह अनेक इमारतींना त्यांचे नाव देण्यात आले आहे.
  • अण्णाभाउंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशिया पर्यंत पोवाड्यातून सांगितले पुढे त्याचे रशियन भाषेमध्ये भाषांतर झाले आणि राष्ट्राध्यक्षांकडून त्यांचा सन्मान देखील झाला.
  • अण्णाभाऊ यांच्या जातीव्यवस्था, दलित सवर्ण संघर्ष, निसर्ग, स्थलांतरण, शहर आणि ग्रामिण जीवन यांतील संघर्ष असे अनेक पैलू पाहायला मिळतात.
  • महाराष्ट्रातील विद्यापीठांत अण्णाभाऊंवर अकरा प्रबंध सिद्घ केले गेले आहेत. 
  • पुणे विद्यापीठात त्यांच्या सन्मानार्थ ‘अण्णाभाऊ साठे’ अध्यासन सुरु करण्यात आले आहे.
  • त्यांच्या कथा-कादंबऱ्यांची केवळ भारतीयच नव्हे, तर 22 परकीय भाषांत भाषांतरे झाली आहेत.
लोकशाहीर सामाजिक कार्यकर्ते आणि सुप्रसिद्ध लेखक अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या