स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी ची कहाणी | story of Stanford university

0
1366
views

स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी ची कहाणी ( Stanford university )

अमेरिकेतील जगप्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठाच्या प्रेसिडेंटना भेटण्यासाठी म्हणून एक वृद्ध जोडपे अपॉइंटमेंट न घेता भेटायला आले. त्या जोडप्याचा वेश नुसताच साधा नव्हता, तर गबाळा पण होता. म्हातारबाईंनी घातलेला फ्रॉक अगदी साधा, चुरगळलेला आणि थोडासा मळलेला होता, तर म्हातारबुवांनी घातलेला सूटही घरी शिवलेला, ढगळ, गबाळा आणि इस्त्री न केलेला होता. प्रेसिडेंटच्या केबिनबाहेर पॉश काउंटरवर बसलेल्या सेक्रेटरीकडे ते जोडपे आले.

‘आम्हाला प्रेसिडेंट साहेबांची फक्त दहा मिनिटेच भेट हवी आहे! मिळेल का?’ त्या आजीबाईंनी नम्रपणे विचारले.

त्या जोडप्याचा तो गबाळा अवतार बघून ती सेक्रेटरी थोडीशी नाराज झाली. तिला वाटले हे एक गरीब जोडपे आहे. एकतर भीक मागायला, म्हणजे डोनेशन मागायला आले असेल किंवा मुलाच्या फीमध्ये सवलत मागायला आले असेल. अशा लोकांना कसे टोलवायचे हे तिला चांगलेच ठाऊक होते.

‘प्रेसिडेंट साहेब सध्या कामात आहेत! ते लगेच भेटू शकणार नाहीत!’ तिने उर्मटपणे सांगितले. तिला वाटले तिच्या या उत्तराने ही ब्याद एकदाची टळेल.

‘ठीक आहे! आम्ही वाट बघू! पण त्यांना भेटूनच परत जाऊ!’ त्या आजी नम्रपणे म्हणाल्या आणि ते जोडपे तेथे ठेवलेल्या सोफ्यावर जाऊन बसले.

प्रेसिडेंट साहेब खरच बिझी असावेत. दोन-चार वेळा ते केबिनच्या बाहेर आले. त्यांनी उंची सूट घातला होता, पायात चकचकीत बूट होते, चेहऱ्यावर अधिकाराचा रुबाब होता. त्यांनी त्या म्हाताऱ्या जोडप्याकडे पाहून न पाहिल्यासारखे केले आणि त्यांची काही दखल घेतली नाही. बघता बघता दिवस संपायला आला. संध्याकाळ व्हायची वेळ आली. तरीही ते वृद्ध जोडपे बसूनच होते. शेवटी त्या सेक्रेटरीलाच दया आली असावी.

‘ते वृद्ध जोडपे सकाळपासून तुम्हाला भेटायची वाट बघते आहे. तुम्ही त्यांना पाच मिनिटे तरी भेटावे,’ सेक्रेटरीने प्रेसिडेंटला सांगितले. प्रेसिडेंटना घरी जयची घाई होती, तरीही केवळ पाच मिनिटेच भेटायला ते एकदाचे तयार झाले!

‘काय काम आहे?’ प्रेसिडेंट साहेब केबिनच्या बाहेर आले आणि त्या वृद्ध जोडप्याला विचारू लागले. चेहऱ्यावर बऱ्यापैकी नाराजी होतीच.
‘हे पाहा! आमचा एकुलता एक मुलगा काही वर्षांपूर्वी या विद्यापीठाचा विद्यार्थी होता. आता दुर्दैवाने तो नाही. विद्यापीठाच्या आवारात त्याचे एखादे स्मारक असावे असे आम्हाला वाटते. म्हणून आम्ही तुम्हाला भेटायला आलो!,’ ती वृद्ध महिला नम्रपणे म्हणाली.

‘स्मारक? कसले स्मारक? म्हणजे तुम्हाला इथे त्याचा पुतळा वगैरे उभारायचा आहे काय? ते शक्य नाही. आम्ही जर मृत पावलेल्या प्रत्येक माजी विद्यार्थ्याचा पुतळा येथे उभारू लागलो, तर आमच्या युनिव्हर्सिटीचे स्मशान व्हायला वेळ लागणार नाही!’ प्रेसिडेंटसाहेब काहीशा वैतागानेच म्हणाले.

‘नाही नाही! तसे नाही!’ त्या आजीबाई परत बोलू लागल्या, ‘आम्हाला येथे त्याचा पुतळा वगैरे उभारायचा नाही. त्याचे स्मारक म्हणून तुमच्या विद्यापीठाला एखादी चांगली इमारत वगैरे बांधून देण्याचा विचार आहे!’

त्या आजीबाईंच्या चुरगळलेल्या, मळक्या कपड्यांकडे बघून प्रेसिडेंट साहेबांना हसूच आले. ‘इमारत? इमारत बांधायला किती पैसे लागतात ठाऊक आहे का? तुम्हाला म्हणून सांगतो. या विद्यापीठाच्या कॅम्पसमधील इमारती बांधायला आम्हाला ७५ लाख डॉलर्स लागले!’ प्रेसिडेंटसाहेब सांगत असतातना या जोडप्याच्या खिशात ७५ डॉलर्स तरी असतील की नाही याची त्यांना खात्री वाटत नसावी असा त्यांचा चेहरा होता.

‘युनिव्हर्सिटी काढायला एवढेच पैसे लागतात?’ त्या आजीबाई हळूच त्या म्हातारबुवांच्या कानात कुजबुजल्या. प्रेसिडेंटसाहेबांचे आभार मानून मिस्टर आणि मिसेस … लेलँड स्टॅनफोर्ड नावाचे हे वृद्ध जोडपे तेथून बाहेर पाडले.

पुढे ते कॅलिफोर्निया राज्यातील पालो आल्टो या गावी आले आणि स्वतःच्या मुलाच्या नावाने युनिव्हर्सिटी चालू केली. हीच आहे जगप्रसिद्ध स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी (Stanford university) !

Stanford university
मिस्टर आणि मिसेस … लेलँड स्टॅनफोर्ड. सौजन:-http://facts.stanford.edu/

आज स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी ही जगातील नंबर एकची युनिव्हर्सिटी म्हणून ओळखली जाते. ८१८० एकर जमिनीवर या युनिव्हर्सिटीचा पसारा पसरला आहे. या युनिव्हर्सिटीचे वार्षिक बजेट भारत सरकारच्या वार्षिक बजेटच्या तिपटीहून जास्त असते. जगात सगळ्यात जास्त ‘नोबेल लॉरिएट्स’ (नोबेल पारितोषिक विजेते) या युनिव्हर्सिटीसाठी काम करतात. आज या युनिव्हर्सिटीत ३२ नोबेल लॉरिएट्स प्रोफेसर म्हणून काम करत आहेत.

अनेक जणांना माणसाची पारख त्याच्या कपड्यांवरून किंवा बाह्य रूपावरून करायची सवय असते; पण अनेकदा ही सवय घातक ठरते. पॉश किंवा फॅशनेबल कपडे घालणारा माणूस हा खऱ्या अर्थाने श्रीमंत किंवा चांगल्या कॅरॅक्टरचा असतोच असे नाही. तसेच सर्वसामान्य कपडे घालणारा, सामान्यपणे राहणारा माणूस गरीब, दळिद्री किंवा ‘लो कॅरॅक्टर’चा असतो असेही नाही. अनेक वेळा आपण माणसाच्या कपड्यांवरून किंवा बाह्य रूपावरून चुकीची पारख करतो आणि एखादा चांगला मित्र, हितचिंतक किंवा गिऱ्हाइक हातचे घालवून बसतो.

माणसाच्या कपड्यांवरून किंवा बाह्य रूपावरून त्याची पारख करायची घातक सवय, असल्यास, ती सोडून द्या!
अर्थात असे करायचे की नाही हे तुमचे तुम्ही ठरवा!

(हे लिखाण मराठी मोटिव्हेशन टीम चे नाही . हा whatsapp वर आलेला अप्रतिम लेख आहे.)

या लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.